पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लागेबांधे करुन महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा मोबाईल क्रमांक घ्यावा. त्यावर ‘मिस कॉल’ करुन भ्रष्टाचाराला सनदशीन मार्गाने विरोध करावा, असे आवाहन भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात नगरसेवक कामठे यांनी रविवारी सकाळी ‘फेसबूक लाईव्ह’ केले. त्यावेळी महापालिका ठेकेदारांनी चालवायला घेतली आहे का? असा सवाल उपस्थित केला. वैद्यकीय आणि शालेय शिक्षण हे दोन्ही विभाग सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यामध्ये कोणताही गैरप्रकार सहन करणार नाही. माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनता आहे. त्यामुळे मी कुणाच्याही दबावाला घाबरणार नाही, असेही कामठे यांनी म्हटले आहे.
नागरिकांना आवाहन करताना कामठे यांनी थेट महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा मोबाईल क्रमांक जाहीर केला. नागरिकांनी 7887880999 या क्रमांकावर फोन करुन आयुक्तांना मिस कॉल करावा. त्याद्वारे भ्रष्टाचाराला विरोध करुन आयुक्तांवर दबाव निर्माण करावा, असे आवाहन केले आहे.