राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी रात्री भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी भेट देऊन लांडे कुटुंबियांचे सांत्वन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कुटुंब लांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
माजी आमदार विलास लांडे यांचे वडील दिवंगत हभप विठोबा सोनबा लांडे यांचे ३० जून रोजी निधन झाले. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी चिंचवडच्या विकासात आणि जडणघडणीत दिवंगत विठोबा लांडे यांचे योगदान राहिले आहे. तसेच ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते.
दिवंगत विठोबा लांडे यांनी शरद पवार यांना घरातील देवघरात स्थान दिले होते. देवघरात विठ्ठलाच्या मूर्तीशेजारी शरद पवार यांचा फोटो ठेवून ते त्यांची नित्य पूजा करत होते. दोन महिन्यांपूर्वी विलास लांडे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे शरद पवार यांनी लांडे यांना फोन करून कुटुंबियांचे सांत्वन केले होते. शरद पवार यांनी लांडे यांच्या वडीलांची विचारपूस केली होती. लांडे यांचे वडील १०२ वर्षांचे असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना लवकरच भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तत्पूर्वीच दिवंगत हभप विठोबा लांडे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी रात्री विलास लांडे यांच्या भोसरीतील घरी येऊन लांडे कुटुंबियांचे सांत्वन केले. लांडे कुटुंबाच्या दुःखात पवार कुटुंबीयही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.