पीएमपीएमएलने लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतुक सुविधा बंद केल्याने रोजंदारी बदली कर्मचा-यांना काम मिळु शकले नाही. त्यामुळे त्यांना दरमहा मासिक वेतन न मिळाल्याने या कामगारांची व कुटुंबियांची आर्थिक कुचंबणा होत आहे. हे लक्षात घेऊन पीएमपीएल’च्या भोसरी आगाराने (गुरुवारी) स्तुत्य उपक्रम राबविला. येथील कायम कर्मचा-यांकडून बदली कामगारांना जीवनावश्यक साहित्य पुरवत मदतीचा हात दिला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हयामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र मार्च महिन्यापासुन सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतुक सुविधा बंद करण्यात आल्यामुळे ‘पीएमपीएल’ महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. महामंडळाचे उत्पन्न घटल्याने फक्त कायम कर्मचा-यांनाच रोटेशन पध्दतीने कामावर बोलावण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना भोसरी आगाराचे आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे म्हणाले की, लॉकडाऊन मुळे अतिशय बिकट परिस्थिती भोसरी आगारातही निर्माण झाली. भोसरी आगारामध्ये चालक व वाहक , झाडुवाला, क्लिनर असे एकुण ९२ बदली कर्मचारी हजेरीपटावर आहेत. यांना वेतन मिळालेले नाही. ही सर्व परिस्थिती विचारात घेता सामाजिक बांधिलकी म्हणुन कायम कर्मचा-यांकडून बदली कामगारांना अल्प स्वरूपात काही मदत देण्याचा उददेश ठेवून भोसरी आगारातील कायम कर्मचा-यांनी खेच्छेने एकत्र येउन निधी जमा केला आहे. या निधीमधुन रोजंदारी कर्मचा-यांसाठी जिवनावश्यक वस्तुंचे किट व सॅनिटायझर, फेसमास्क व फेस शिल्ड खरेदी करण्यात आले. या सर्व वस्तु आणि किटचे वाटप करण्यात आले.




















































