‘भाऊ जिथे, यश तिथे’चा वारसा पुढे नेण्याचा निर्धार’
प्रतिनिधी; ppcnews.in पिंपरी:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पिंच) सार्वत्रिक निवडणुकीसाठी (२०२५-२६) भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रभाग क्रमांक ३१ (सर्वसाधारण महिला, क प्रवर्ग) साठी डॉ. अँड श्वेता विजय इंगळे-सरकार यांना कमळ या चिन्हावर उमेदवार म्हणून उतरवण्याचा शक्यता बनली आहे. डॉ. इंगळे-सरकार यांनी आपल्या उमेदवारीबाबत बोलताना, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या “भाऊ जिथे, यश तिथे” या कानमंत्राचा उल्लेख करून पक्षाच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. इंगळे-सरकार म्हणाल्या, “दिवंगत लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी कारकिर्दीतून हा कानमंत्र लाभला आहे. भाऊंच्या निधनानंतर आमदार अश्विनीताई जगताप यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली, तर विद्यमान आमदार शंकरभाऊ पांडुरंग जगताप यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळे विकासाचा प्रवास अधिक मजबूत झाला.
देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने नेहमीच गुणवत्ता व कर्तृत्वाला प्राधान्य दिले, हे मी अनुभवले आहे. माझ्या शैक्षणिक, सामाजिक व कायदेशीर कार्याची दखल घेऊन पक्षाने मला ही संधी दिली, याची खात्री आहे.”
निवडणूक लढण्याबाबत बोलताना त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. “निवडून आल्यावर मी प्रभागातील नागरिकांसाठी हक्काची साथ देण्यासाठी नेहमी उपलब्ध राहीन.
युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, महिलांसाठी सबलीकरण व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारणार. दररोज योग्य दाबाने मुबलक पाणीपुरवठा, दारापर्यंत नियमित कचरा संकलन, औषध फवारणी व पाण्याचा निचरा यांसारख्या छोट्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधेन. बीज खंडित झाल्यास त्वरित पाठपुरावा घेईन,” असे त्या म्हणाल्या.
कर वसुलीचा मुद्दा उपस्थित करताना डॉ. इंगळे-सरकार म्हणाल्या, “कराच्या रूपाने दिलेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य विनियोग होतोय का, हे तपासण्यासाठी नागरिकांसोबत पालिकेत जाब विचारेन. ही महानगरपालिका आपली आहे. एक नगरसेविका काय करू शकते, हे दाखवण्यासाठी एकदा संधी द्या! माझ्या कामांसाठी तुम्ही मला कायम लक्षात ठेवाल. ‘लेक मी सावित्रीची, लेखणी घेऊन तयार आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, मी तळपती तलवार आहे!'”
निवडणूक आयोगाने २०२६ मध्ये ही निवडणूक घेण्याची घोषणा केली असून, भाजपकडून इतर प्रभागांसाठीही उमेदवार जाहीर होत आहेत. डॉ. इंगळे-सरकार यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ३१ मधील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा तापली आहे.




















































