पिंपरी-चिंचवड :
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे तब्बल ८४ नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत पक्ष स्पष्ट बहुमतात आहे. त्यामुळे भाजपच्या गटनेतेपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या बैठकीत प्रशांत कृष्णराव शितोळे यांची भाजप गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत भारतीय जनता पार्टी गटास अधिकृत मान्यता देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ या नावाने अधिकृत गट स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
याच वेळी प्रभाग क्रमांक ३२–ड मधून निवडून आलेले नगरसेवक श्री. प्रशांत कृष्णराव शितोळे यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचा ठराव उपस्थित सर्व नगरसेवकांनी संमतीने मंजूर केला.
दरम्यान, सदर गटाची तसेच गटनेत्याची नोंद मा. विभागीय आयुक्त, पुणे आणि मा. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार पुढील अधिकृत कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
भाजपच्या ८४ नगरसेवकांच्या बळावर महापालिकेत पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली असून, प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप गट शहराच्या विकासासाठी अधिक प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.





















































