पुणे:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे, ग्लोव्हज वापरणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व खाजगी कंपन्यांनी कंपनीकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे अनिवार्य आहे असे कळविण्यात आलेले आहे.

वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने कारवाई करण्यात येत आहे. शहर स्वच्छता व नियोजन कायद्या अंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३ (ए) व ४ आणि कलम २४४, ३७६ अन्वये कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडील मा. सहाय्यक महापालिका आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या मार्गदर्शना नुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व नरेंद्र भालेराव, आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे, दिनेश सोनावणे, अब्दुल करीम मुजावर, नितीन राजगुरू, प्रमोद ढसाळ, धनाजी नवले, शांताराम सोनावणे, एकनाथ माने, प्रियांका कंक-भिंताडे यांचे सहाय्याने थर्मो टच इंडिया प्रा. लि. यांचेवर कारवाई करून त्यांचाकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट न केल्यामुळे १५,०००/- आणि मायक्रो इंडिया इंजिनिअरींग लि. यांचेकडून १०,०००/- असे एकूण २५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.





















































