ppcnews.in
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
“जिथे ज्ञान, तिथे परिवर्तन… आणि जिथे सेवा, तिथे समाधान” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत सौ. सारिका कृष्णा भंडलकर यांनी प्रभाग क्रमांक ३२ मधून निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या मतदारांसमोर विकास, शिक्षण आणि समाजसेवेचा ठोस अजेंडा घेऊन उभ्या राहिल्या आहेत.
जुनी सांगवी आणि नवी सांगवी या परिसरात बालपण गेलेल्या सौ. सारिका भंडलकर यांचे कुटुंब आणि सामाजिक जडणघडण याच परिसरात झाली आहे. शिक्षण आणि समाजकार्याची आवड लहानपणापासूनच असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल, जुनी सांगवी येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी., त्यानंतर बी.एड., डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (DSM), एम.ए. (एज्युकेशन) तसेच जपानी भाषेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे.
गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ त्या CBSE शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. “एक चांगला शिक्षक समाज घडवतो” या विचाराने प्रेरित होत त्यांनी शिक्षणासोबत समाजसेवेलाही महत्त्व दिले आहे.
महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम, मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, पर्यावरणपूरक उपक्रम, रक्तदान व आरोग्य शिबिरे, योग दिन, तसेच ‘ज्ञानज्योती’ शिक्षण प्रकल्प अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सांगवी परिसरात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत समाजाशी त्यांचा सततचा संवाद राहिला आहे.
“राजकारण हे केवळ पदासाठी नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे,” असे मत व्यक्त करत सौ. सारिका भंडलकर यांनी महिलांना आणि युवकांना संधी मिळाल्यास समाज आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सौ. सारिका कृष्णा भंडलकर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ३२ मधील निवडणूक लढत अधिकच लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















































