पिपीसी न्यूज प्रतिनिधी
सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या अनोख्या प्रचार पद्धतीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. पारंपरिक प्रचाराच्या पलीकडे जात थेट पोस्टाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा अभिनव प्रयोग शिवसेना उमेदवारांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून अनुसूचित जाती महिला प्रवर्ग (अ) मधून सारिका कृष्णा भंडलकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) मधून निलिमा महेश भागवत आणि सर्वसाधारण खुल्या गटातून सुमित अरविंद भोसले हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पॅनेलमधील तिन्ही उमेदवार सांगवी परिसरात सर्वपरिचित असून सामाजिक, शैक्षणिक व नागरिकहिताच्या कामांमुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या उमेदवारांनी टपालाच्या साईजच्या विशेष प्रचार पत्रकांद्वारे थेट नागरिकांच्या घरोघरी पोहोचत मतदानाचे भावनिक आवाहन केले आहे. “आपल्या हक्कासाठी, विकासासाठी आणि विश्वासासाठी मतदान करा,” असा संदेश देणाऱ्या या पत्रकांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
या अनोख्या प्रचार पद्धतीला संपूर्ण प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत असून, शिवसेना उमेदवारांचा हा उपक्रम मतदारांशी थेट नाते जोडणारा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभागात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे या उमेदवारांच्या झंझावती प्रचारामुळे येथील निवडणूक रंगतदार होईल असा अंदाज बांधला जात आहे.



















































