शोकसभेत राजकीय टीकेचा भडका; सीमा ताई सावळेंवर भाजपचा जाहीर निषेध
पिपीसी न्यूज प्रतिनिधी
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड :
कै. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा कार्यक्रमात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात सीमा ताई सावळे यांनी वैयक्तिक पातळीवर आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात टीका-टिप्पणी केल्याने राजकीय वातावरण तापले असून शहरभर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सीमा ताई सावळे यांच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पक्षाच्या वतीने निषेध नोंदवला असून, अशा प्रकारच्या कृतीमुळे राजकीय संस्कृतीला तडा जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील एका वॉर्डातून सीमा ताई सावळे यांचा पराभव झाला होता. त्या पराभवाची खंत शोकसभा कार्यक्रमात व्यक्त करत त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट आरोप करत पालकमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या संदर्भात टीकात्मक विधान केल्याचे सांगितले जात आहे. शोकसभा सारख्या संवेदनशील आणि सर्वपक्षीय कार्यक्रमात अशा प्रकारची वैयक्तिक टीका अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शोकसभा कार्यक्रमात दोघेही समोरासमोर असताना सीमा ताई सावळे यांनी भर सभेत आमदार महेश लांडगे यांना थेट आव्हान दिल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी संयम दाखवत संपूर्ण भाषण शांतपणे ऐकून कार्यक्रमस्थळावरून निघून जाणे पसंत केले.
या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शोकसभा हा श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम असून वैयक्तिक राजकीय टीका करण्यासाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध असताना जाणीवपूर्वक या कार्यक्रमाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

















































