राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झालेले असून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त महापूजा केली जाईल. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचा विठूमाऊलीच्या पुजेसाठी विशेष मान असतो. त्यासाठीच उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील मानाच्या पालख्या देखील पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
आषाढी एकादशी महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मंदिरात केवळ 9 मानाच्या पालख्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. लोकप्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. एकूणच राज्यभरातील कोरोनाचे संकट आता थेट विठ्ठलाच्या दारात येऊन ठेपले आहे. इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची महापुजा अनेक निर्बंधांसह पार पडत आहे.





















































