साधनेतुन उत्तम कलाभ्यासक हा सिध्द कलाकार बनतो
1) कलेचा वारसा लाभला कसा लाभला? कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळाला का?
* उत्तर- निश्चितच, कलेचा वारसा हा मला माझ्या कुटुंबातूनच लाभला. माझे वडील पं.रघुनाथजी खंडाळकर हे स्वतः एक शास्त्रीय गायक असून ते अजूनही ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मला गाण्याची आवड निर्माण झाली.
2) या क्षेत्रातच का आलात? या क्षेत्राने आतापर्यंत तुम्हाला काय दिले?
* उत्तर- घरातच गाण्याचा वारसा असल्यामुळे लहानपणापासुन गाण्याची आवड निर्माण झाली. ह्या क्षेत्रात आल्यामुळे, वयाच्या अगदी नवव्या वर्षापासूनच रंगमंचावर सादरीकरण करण्यास मिळाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी ‘सा रे ग म प लिट्ल चैम्प्स’ ह्या स्पर्धेत विजयी होण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे, मला अनेक सांगितीक अनुभव मिळाले. तसेच, गायनाच्या क्षेत्रात येणारे चढ उतर मला अनुभवता आले. गाण्याचे हे क्षेत्र किती मोठ्या स्वरूपाचे आहे हे मला आत्ता जाणवत आहे. अनेक मोठ मोठ्या कार्यक्रमांमध्ये, मोठ मोठ्या महोत्सवांमध्ये गायन आणि अनेक प्रेक्षकांसमोर आपलं गाणं मांडण्याची संधी मला ह्या क्षेत्राने नक्कीच मिळवुन दिली आहे. माझी कला लोकांसमोर सादर करण्याचे भाग्य मला मिळत आहे. ह्या क्षेत्रामुळे अनेक मोठ मोठ्या लोकांचा सहवास व त्यांच मार्गदर्शनही मला लाभत आहे.
3) या क्षेत्रात आज प्रगती करीत आहात त्याचे श्रेय कोणाला जाते?
* उत्तर- ह्याचे श्रेय माझे वडील आणि गुरू पं. रघुनाथजी खंडाळकर आणि माझा मोठा भाऊ सुरंजन खंडाळकर ह्यांना जातं. तसेच,कै. पं. मधुसुधनजी कुलकर्णी आणि सध्या मी शास्त्रीय संगीताचे धडे ज्यांच्याकडुन घेत आहे असे माझे गुरू पं. रघुनंदन पणशीकर ह्यांना जातं. गाण्याच्या क्षेत्रात मी जी काही थोडी फार प्रगती केली आहे ती ह्यांच्यामुळेच.
4) या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे किती अवघड आहे? ते तुम्ही कसे करता?
* उत्तर – माझ्या दृष्टीने ह्या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे हे अतिशय अवघड आहे. ह्या क्षेत्रात अतिशय हरहुन्नरी कलाकार आपले गायन सादर करत आहेत. त्यांच्या बरोबरीने आपले गायन लोकांपर्यंत तेवढ्याच ताकदीने पोहोचवणे नक्कीच अवघड आहे.
5) फावल्या वेळात तुम्ही कोणता छंद जोपासता?
* उत्तर- मी फावल्या वेळात गाण्याबद्दल म्हणायचं झालं तर हार्मोनियम घेऊन काहीतरी नवीन कंपोज करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि गाण्याच्या व्यतिरिक्त एखादी वेब सेरीज पाहणे, तसचं क्रिकेट, बैडमिंटन खेळणे, चित्रपट पाहणे हे मला आवडते.
6) तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे? पुढील काळात तुम्ही काय करणार आहात?
* उत्तर – मला गायनाच्या क्षेत्रात नाव मिळविण्यापेक्षाही एक परिपक्व गायक व्हायला नक्की आवडेल. माझा मोठ्ठा भाऊ सुरंजन खंडाळकर आणि मी आम्ही सोबतीने शास्त्रीय संगीत ड्यूएट गाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात सातत्य टिकवून ठेवण्याच काम आम्हाला करायचं आहे. शास्त्रीय संगीतासोबतच संगीतातील अनेक गायन प्रकार मला आत्मसात करायचे आहेत आणि शेवट पर्यंत संगीताचा एक विद्यार्थी म्हणून राहायचे आहे.
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादक, पीपीसी न्यूज नेटवर्क, पुणे)